ललित मोदींचा CSK वर फिक्सिंगचे आरोप, IPL लिलावाबद्दल खळबळजनक खुलासा

IPL क्रिकेट चाहत्यांसाठी नेहमीच रोमांचक ठरले आहे. मात्र, स्पॉट-फिक्सिंगच्या कृत्यामुळे या स्पर्धेवर काळी सावली पडली होती. याच कारणामुळे चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
मात्र, काही वर्षांनंतर हा वाद पुन्हा चिघळला आहे. IPLचे माजी गव्हर्नर ललित मोदी यांनी CSKचे मालक आणि माजी BCCI अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यावर IPL फिक्सिंगचा आरोप केला आहे. मोदींनी खुलासा केला की श्रीनिवासन यांनी श्रीलंकेचा खेळाडू थिसारा परेराला वगळण्याची मागणी केली होती, जेणेकरून इंग्लंडचा अष्टपैलू अँड्र्यू फ्लिंटॉफ संघात सामील होऊ शकेल.
फ्लिंटॉफच्या लिलावावर मोदींचा दावा
IPLच्या इतिहासातील स्पॉट-फिक्सिंग हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. IPL 2025चा मेगा लिलाव झाल्यानंतर ललित मोदींनी पुन्हा एकदा सनसनाटी आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला की श्रीनिवासन यांनी थिसारा परेराला वगळून अँड्र्यू फ्लिंटॉफला संघात घेण्याची विनंती केली होती.
मोदी म्हणाले, “लिलावामध्ये सर्वकाही ठरवले जात होते. मी फ्लिंटॉफ श्रीनिवासनला दिला. याबद्दल कोणतेही संशय नाही. प्रत्येक संघाला याची कल्पना होती. श्रीनिवासन IPL होऊ देणार नव्हते. तो आमच्या बोर्डाचा मोठा विरोधक होता. होय, मी इतर संघांना फ्लिंटॉफला निवडू नका, असे सांगितले. हे मीच केले, कारण श्रीनिवासन याला हवा होता,” असे मोदी म्हणाले.
चेन्नईला झुकते माप? श्रीनिवासन यांच्यावर मोदींचे आरोप
IPLच्या सुरुवातीस भारतातील क्रिकेट चाहत्यांना T20 स्वरूपाची नवी पर्वणी मिळाली. मात्र, ललित मोदींच्या म्हणण्यानुसार, श्रीनिवासन सुरुवातीला IPLच्या विरोधात होते. मात्र, या स्पर्धेचे यश पाहून त्यांनी आपला विचार बदलला.
मोदी म्हणाले, “त्यांना IPL आवडत नव्हते, ते म्हणायचे की ही संकल्पना चालणार नाही. पण नंतर ती यशस्वी होऊ लागली, आणि त्यांनाही या योजनेचा भाग व्हायचे होते. त्यानंतर ते माझ्या विरोधात गेले.”
मोदींनी श्रीनिवासन यांच्यावर चेन्नईसाठी पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, श्रीनिवासन यांनी चेन्नईच्या सामन्यांमध्ये चेन्नईच्या पंचांची नियुक्ती करून संघाला अप्रत्यक्ष फायदा मिळवून दिला.
“त्यांनी पंच नेमणुकीत हस्तक्षेप केला. सुरुवातीला मला याचा अर्थ कळला नाही. पण नंतर लक्षात आले की चेन्नईच्या सामन्यांसाठी ते चेन्नईच्या पंचांना नेमत आहेत. मला हा प्रकार चुकीचा वाटला. ही अप्रत्यक्ष फिक्सिंग आहे,” असे मोदी म्हणाले.
CSK चा वादग्रस्त इतिहास
हे पहिल्यांदाच नाही की CSK वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. IPL 2015 मध्ये CSK संघावर बेकायदेशीर सट्टेबाजीच्या आरोपांमुळे बंदी घालण्यात आली होती. या वादात महेंद्रसिंह धोनी यांचेही नाव आले होते, मात्र त्यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत.
अखेरीस, CSKने दोन वर्षांच्या बंदीनंतर 2018 साली स्पर्धेत पुनरागमन केले. मात्र, या वादांमुळे CSKचा प्रतिमा डागाळली आहे. मोदींच्या या नव्या आरोपांमुळे या प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. CSKच्या इतिहासातील हे आरोप संघासाठी पुन्हा एकदा डोकेदुखी ठरू शकतात.
जसप्रीत बुमराह ICC कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर, विराट कोहलीचीही क्रमवारीत झेप