“जसप्रीत बुमराह हा क्रिकेटच्या इतिहासातील महान गोलंदाजांपैकी एक” ट्रेविस हेडच वक्तव्य
पर्थ कसोटीत भारताच्या प्रभावी गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले होते. मात्र, ट्रॅव्हिस हेडच्या झुंजार 89 धावांच्या खेळीमुळे संघाला काहीशी स्थिरता मिळाली होती. या सामन्यानंतर मालिकेतील दुसऱ्या कसोटीचा थरार आता ॲडलेडच्या मैदानावर रंगणार आहे. स्थानिक खेळाडू ट्रॅव्हिस हेड आपल्या घरच्या मैदानावर जबाबदारीने खेळ करत संघाला चांगली सुरुवात करून देण्यासाठी सज्ज आहे.
जसप्रीत बुमराहसाठी कौतुकाचे शब्द
दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने हेडला बाद केले होते. बुमराहच्या अप्रतिम गोलंदाजीबद्दल हेडने भरभरून कौतुक केले.
“जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या इतिहासातील महान वेगवान गोलंदाजांपैकी एक ठरेल. त्याच्या गोलंदाजीचा सामना करणं हे एक आव्हान आहे. भविष्यात जेव्हा मी माझ्या करिअरकडे मागे पाहीन, तेव्हा मी बुमराहला खेळल्याचा अभिमान वाटेल,” हेड म्हणाला.
बुमराहविरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी त्याने नेहमी मानसिक ताजेपणा ठेवणे आणि चेंडूवर बारकाईने लक्ष ठेवणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. “मी त्याच्या गोलंदाजीचा अनेक वेळा सामना केला आहे, त्यामुळे त्याला कसे खेळावे हे मला समजते. पण प्रत्येक वेळी तयारीला तोच महत्त्वाचा घटक ठरतो,” हेडने स्पष्ट केले.
पर्थमधील पराभवाचा परिणाम कमी
पर्थ कसोटीत मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतरही तो पराभव संघासाठी तितका क्लेशदायक नव्हता, असे हेडने सांगितले. “तो सामना आम्हाला किती कठीण होता, याचा अंदाज सामन्यादरम्यानच आला होता. त्यामुळे त्यातून पुढे जाणं तुलनेने सोपं झालं. आम्हाला आता ॲडलेडसाठी अधिक चांगली तयारी करायची आहे,” हेड म्हणाला.
हॅझलवूडची उणीव आणि डॉगेटची संधी
दुसऱ्या कसोटीसाठी जोश हॅझलवूड संघाबाहेर असल्यामुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाजीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र, संघाकडे अन्य गोलंदाजांचा उत्तम पर्याय उपलब्ध असल्याचे हेडने सांगितले. ब्रेंडन डॉगेटला यावेळी संधी मिळण्याची शक्यता आहे.
“हॅझलवूडची अनुपस्थिती मोठी आहे. पण आमच्याकडे स्कॉट बोलंड, सीन ॲबॉट, आणि ब्रेंडन डॉगेटसारखे गोलंदाज आहेत. डॉगेटने ॲडलेडच्या मैदानावर चांगलं प्रदर्शन केलं आहे. त्याला जर संधी मिळाली, तर त्याने अपेक्षापूर्ती केलीच पाहिजे,” हेड म्हणाला.
ॲडलेड मैदानावर हेडची खास कामगिरी
ट्रॅव्हिस हेडने मागील दोन वर्षांत ॲडलेड कसोटीत शानदार प्रदर्शन करत ‘सामनावीर’ पुरस्कार पटकावले आहेत. मैदानाच्या विशिष्ट स्वरूपामुळे त्याला येथे चांगली फलंदाजी करता येते, असे हेडने सांगितले. चौकारासाठी लहान असलेले चौकोन आणि चेंडूची विकेटवरील हालचाल त्याच्या फटक्यांना चांगली साथ देते.
“ॲडलेडचं मैदान मला बालपणापासून परिचित आहे. येथे खेळताना नेहमी चांगल्या परिस्थितीत फलंदाजीची संधी मिळाली आहे,” हेड म्हणाला. “या विकेटच्या स्वभावामुळे माझ्या फलंदाजीला मदत होते. त्यामुळे यावेळेसही चांगली कामगिरी करण्याचा माझा आत्मविश्वास आहे.”