काय सांगता? विराट कोहलीची बॅट 5 कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिटांपेक्षा महाग!
विराट कोहलीच्या स्वाक्षरीसह असलेली बॅट ग्रेग चॅपेल क्रिकेट सेंटरमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आला असून त्याची किंमत 2985 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे 1.65 लाख रुपये) आहे. ही किंमत भारतात होणाऱ्या कोल्डप्ले कॉन्सर्टच्या 5 प्रीमियम तिकिटांपेक्षा खूप जास्त आहे.
ऑस्ट्रेलियात कोहलीचं वेगळंच फॅनफॉलोइंग
बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी विराट कोहली काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियात पोहोचला, आणि तिथल्या माध्यमांमध्ये त्याच्या आगमनाची प्रचंड चर्चा झाली. भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेटची क्रेझ निर्माण करत, तिथल्या वृत्तपत्रांनी कोहलीच्या मोठ्या फोटोसह पहिलं पान सजवलं.
कोहलीचं नाव फक्त भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. पण ऑस्ट्रेलियातील लोकांमध्ये त्याचं एक वेगळं स्थान आहे. यावेळी, कोहलीच्या चाहत्यांची क्रेझ आणखी वाढल्याचं दिसून येतंय.
स्वाक्षरी केलेला बॅट ठरतोय चर्चेचा विषय
नॉर्मन कोचानेक यांनी नुकतीच ग्रेग चॅपेल क्रिकेट सेंटरला भेट दिली. तिथे त्यांना दिसलं की, विराट कोहलीच्या स्वाक्षरीसह एक खास एमआरएफ बॅट विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. त्याची किंमत 2985 ऑस्ट्रेलियन डॉलर्स, म्हणजे जवळपास 1.65 लाख रुपये आहे.
या बॅटच्या किंमतीने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. विशेष म्हणजे, ही किंमत भारतातील कोल्डप्लेच्या कॉन्सर्टच्या महागड्या तिकिटांपेक्षा खूपच जास्त आहे. कोल्डप्लेच्या कॉन्सर्टचं सर्वात महाग तिकिट 35,000 रुपये आहे, तर कोहलीच्या या बॅटच्या किमतीत तब्बल 5 प्रीमियम तिकिटं सहज खरेदी करता येतील. कोहलीचा ब्रँड किती मजबूत आहे, याचं हे आणखी एक उदाहरण ठरतंय.
कोहलीला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाची खास तयारी
विराट कोहलीच्या फटकेबाजीचा प्रमुख भाग म्हणजे त्याचा अप्रतिम कव्हर ड्राइव्ह. मात्र, अनेकदा त्याच्यावर जास्त विश्वास ठेवणं त्याच्यासाठी धोकादायक ठरतं, खासकरून जेव्हा प्रतिस्पर्धी गोलंदाज अचूक ऑफ-स्टंपच्या बाहेर चेंडू टाकतात. ऑस्ट्रेलियन संघाने याच गोष्टीचा फायदा उचलायचं ठरवलंय.
माजी विकेटकीपर इयान हीली यांनी सल्ला दिला आहे की, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कोहलीला सुरुवातीच्या षटकांमध्ये ड्राइव्ह खेळण्याचा मोह करावा. यामुळे कोहली सुरुवातीलाच चूक करून झेलबाद होण्याची शक्यता वाढते.
कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा
बॉर्डर-गावस्कर मालिकेत कोहलीसाठी अनेक आव्हानं असतील. पण त्याचा अनुभव आणि फॉर्म त्याला मोठी खेळी करण्यास मदत करू शकतो. चाहत्यांची नजर त्याच्या प्रत्येक चेंडूवर असेल, आणि तो आपल्या बॅटमधून जादू दाखवेल, अशी सर्वांना खात्री आहे.
Read More: तुम्हाला माहिती आहे IPL 2008 मध्ये सर्वात महाग खेळाडू कोण होता? 2008 ते 2024 संपूर्ण यादी बघा
One thought on “काय सांगता? विराट कोहलीची बॅट 5 कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिटांपेक्षा महाग!”